शहरात स्मार्ट सिटी योजनेतून सुरू करण्यात आलेल्या सिटी बस रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या सुरू असलेल्या २३ सिटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची लालपरी आता शहरात दिसणार नाही.
एसटी महामंडळाकडून शहरात २३ सिटी बसेस चालविल्या जात होत्या. शहरात स्मार्ट सिटी बस सुरू होताच एसटीच्या बसेस बंद करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने पूर्वीच सांगण्यात आले होते. आता बुधवार पासून स्मार्ट बससेवा सुरू झाल्याने एसटी महामंडळाच्या २३ बसेस रस्त्यावर धावणार नाहीत . शहराच्या १४ मार्गावर २४ स्मार्ट बसेस धावत आहेत.बंद करण्यात येणाऱ्या एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक यांच्याच हातात आता स्मार्ट सिटी बसेसेचे स्टेअरिंग देण्यात आले आहे. स्मार्ट सिटी बसेससाठी २ किमीला ५ रूपया पासून प्रवास भाडे दर आकारण्यात येणार आहे. या बस दोन ते पंधरा किलोमीटर या अंतरादरम्यान धावणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात १०० बसेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून यासाठी टाटा कंपनीकडून ३६ कोटी रूपयांत या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कंपनीकडून २८ बस मनपा प्रशासनाला मिळाल्या आहेत.त्यामधील २४ बस बुधवारपासून प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री पावणे दहा वाजेपयंर्त बसेस धावणार आहेत. त्यामुळे आता या पुढे एसटी महामंडळाची लालपरी सिटी बस आता शहराच्या रस्त्यावर दिसणार नाही. बुधवारी शहरात एकही लाल परी दिसली नाही.
असे चित्र पाहिल्यानंतर अनेकांनी लालपरीच्या आपल्या आठवणी जाग्या केल्या. अनेक प्रवाशांना तर लालपरी ची एवढी सवय झाली होती की एकदम नव्या लूकमध्ये आणि नव्या रंगात आलेल्या बस सिटी बस आहेत म्हणून कल्पनाही नव्हती. अनेकांनी तर या बसचा रंग लाल करावा अशी मागणी केली.